युक्रेनच्या खनिजांमध्ये अमेरिकेच्या गुंतवणुकीबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करून शुक्रवारी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडता येईल अशी आशा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांना होती.
युक्रेनच्या भविष्याबाबत अमेरिकेच्या निर्णायक भूमिकेवर चर्चा करता येईल किंवा अगदीच काही नाही तर निदान अमेरिकेकडून लष्करी सुरक्षिततेची हमी मिळेल असंही त्यांना वाटत होतं.
पण, उलट जगभरातल्या माध्यमांसमोर डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स यांच्या रागाला त्यांना सामोरं जावं लागलं.
गेल्या वर्षांत अमेरिकेनं युक्रेनला दिलेल्या पाठिंब्याबद्दल झेलेन्स्की यांनी आणखी कृतज्ञ असायला हवं यासाठी झेलेन्स्की यांना जगभरासमोर ऐकावं लागलं.
या शक्तीशाली मित्रानं झेलेन्स्की यांना रशियासोबतचं युद्ध थांबवण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. मात्र, झेलेन्स्की यांनी त्याबद्दल दुमत व्यक्त करताच अमेरिकेच्या नेत्यांनी त्यांना उद्धटपणा करत असल्याचं सुनावलं.
ट्रम्प आणि झेलेन्स्की एकत्र पत्रकार परिषद घेतील अशी परिस्थिती निर्माण होण्याच्या आधीच झेलेन्स्की यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
ज्या खनिज कराराचं दोन्ही देशांचे नेते गेल्या आठवड्यात कौतूक करत होते तो तर अपूर्णच राहिला. पण, "शांतता निर्माण करण्यासाठी तयार असाल तेव्हाच परत या," अशी पोस्ट ट्रम्प यांनी झेलेन्स्कींची गाडी बाहेर जाताच सोशल मीडियावर केली.
या बैठकीतीत संभाषण अत्यंत तणावाचं झालं. त्यातील चार मुद्दे आणि त्यामागचं राजकीय-भावनिक विश्लेषण इथं देत आहोत.
1) झेलेन्स्की आणि व्हेन्स यांच्यातला तणाव
बैठकीची सुरुवात झाल्यानंतर 30 मिनिटं नम्रपणे आणि औपचारिक बोलणं सुरू होतं. पण खडाजंगीची सुरुवात ओव्हल ऑफिसमध्ये उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स यांच्या बोलण्यानंतर झाली.
"शांततेकडे आणि भरभराटीकडे जाणारा मार्ग मुत्सद्देगिरीतून जातो," असं ते म्हणाले. "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तेच करत आहेत," अशी जोडही त्यांनी पुढे दिली.
झेलेन्स्की यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं. तीन वर्षांपूर्वी युक्रेनमध्ये पूर्णपणे घुसखोरी करण्याआधी रशियाने अनेकवेळा आक्रमक पावित्रा घेतला होता. तसंच 2019 ला झालेले युद्धबंदीचे प्रयत्न फसले होते, याची त्यांनी आठवण करून दिली.
"तेव्हा त्यांना (रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन) कोणीच थांबवलं नाही," असं झेलेन्स्की पुढे म्हणाले.
"जेडी, तुम्ही नेमक्या कोणत्या प्रकारच्या मुत्सद्देगिरीबद्दल बोलत आहात? तुम्हाला काय म्हणायचं आहे?", असं ते म्हणाले.
यानंतर वातावरणात तणाव स्पष्ट जाणवू लागला. व्हेन्स यांनी उत्तर दिलं की, "तुमचा देश उद्ध्वस्त होण्यापासून थांबवू शकेल, अशा प्रकारचे प्रयत्न."
त्यानंतर उपस्थित अमेरिकन माध्यमांसमोर उपराष्ट्राध्यक्षांनी झेलेन्स्की उद्धटपणा करत आहेत आणि भांडण उकरून काढत आहेत असे आरोप केले.
पुढे व्हेन्स ट्रम्प यांचं समर्थन करू लागले तेव्हा वातावरण आणखी तापू लागलं. पुतीन यांच्यासोबतची चर्चा पुन्हा सुरू करायची आणि युद्धबंदीसाठी त्यांच्यावर दबाव आणायचा अशी ट्रम्प यांची योजना असल्याचं ते सांगू लागले.
2) 'आमचं काय होईल ते आम्हाला सांगू नका'
युक्रेनमध्ये होणारी सक्तीची लष्कर भरती आणि लष्करासोबतच्या इतर समस्यांवर व्हेन्स यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर प्रतिकार करताना झेलेन्स्की म्हणाले, "युद्धाच्या वेळी सगळ्याच देशांना लष्कराच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. तुम्हालाही. पण तुमच्याकडे असलेल्या छान समुद्रामुळे तुम्ही सुरक्षित आहात. त्यामुळे आत्ता त्या परिस्थितीची जाण तुम्हाला नसली तरी भविष्यात होईलच."
झेलेन्स्की यांच्या वक्तव्यावर ट्रम्पही पेटून उठले आणि त्यांनी वादात उडी घेतली.
युद्धात आक्रमक असणाऱ्यासोबत तडजोडी करण्यामधला धोका ट्रम्प यांना समजलेलाच नाही असं युक्रेनचे नेते सुचवू पहात होते.
रशियासोबत झटकन केलेला करार किंवा युद्धबंदीनं पुतीन शांतता प्रस्थापित करतील यावर विश्वास ठेवणं ही ट्रम्प यांची चूक असल्याचं अनेक विश्लेषकांनी सांगितलं आहे. झेलेन्स्की यांचे शब्द त्याला दुजोरा देणारे होते.
रशियाला वाळीत टाकणं बंद करावं आणि लवकरात लवकर युद्धबंदी करावी हा ट्रम्प यांच्या दृष्टीकोन अंमलात आणला तर गोष्टी आणखी चिघळतील असं झेलेन्स्की यांचं म्हणणं होतं.
त्याने पुतीन यांना सत्तेची आणखी हाव चढेल, युरोपची सुरक्षा धोक्यात येईल आणि रशियाला युक्रेन गिळून टाकणं आणखी सोपं होईल.
हे युद्ध म्हणजे दोन देशांमधला संघर्ष आहे आणि दोन्ही देशांनी झालेल्या नुकसानीची आणि युद्धामागच्या कारणांची जबाबदारी उचलली पाहिजे असं चित्र ट्रम्प यांच्या मनात आहे.
पण ट्रम्प यांच्या या विचारामागचे परिणाम किती धोकादायक असू शकतात याबद्दल इशारा देण्याचा प्रयत्न झेलेन्स्की करत होते.
तुम्ही रशियाला शांत करायचा प्रयत्न केला तर युद्ध थांबणार नाही, तर ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल, असं युक्रेनचे नेते ट्रम्प यांना ओव्हल ऑफिसमध्ये थेटपणे सांगत होते. पण, त्याने ट्रम्प भडकले.
"आमचं काय होईल ते आम्हाला सांगू नका. तुम्ही तेवढे मोठे नाही," असं ट्रम्प म्हणाले. त्यांचा आवाजही वाढला होता.
"तुम्ही हजारो लोकांच्या जीवाचा जुगार खेळता आहात आणि त्यासाठी प्रतिकूल पत्तेही तुमच्याकडे आत्ता नाहीत," असंही ते पुढे म्हणाले.
ट्रम्प यांच्यासमोर झेलेन्स्कींनी ठामपणे उभं राहण्याचं अनेकजण कौतुकही करतील. मात्र, येत्या काळात युरोपमध्ये युद्ध होणार की, शांतता नांदणार हे ठरवणारा हा निर्णायक क्षण होता.
3) 'तुम्ही एकटे नाही आहात', ट्रम्प यांचा पलटवार
बोलताना एकदा झेलेन्स्की म्हणाले की, "युद्धाच्या सुरूवातीपासूनच आम्ही एकटे आहोत आणि त्याबद्दल आम्ही आभारच व्यक्त केले पाहिजेत."
याने ट्रम्प आणखी चिडले. या युद्धाचा ताण अमेरिकेतल्या करदात्यांवर येतो आहे असं ते सतत म्हणत होते.
"तुम्ही एकटे नाही आहात. आमच्या मूर्ख राष्ट्राध्यक्षांच्या (बायडन) हस्ते आम्ही तुम्हाला 350 अब्ज डॉलर्स दिले आहेत," असं ट्रम्प म्हणाले.
बैठकीत झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे आभार व्यक्त करण्याची तसदी घेतली का? असा प्रश्न व्हेन्स यांनी विचारला. शिवाय, गेल्या वर्षाच्या शेवटी झालेल्या अमेरिकेच्या निवडणुकीत त्यांनी डेमोक्रॅट्स या विरोधी पक्षासाठी प्रचार केल्याचा आरोप त्यांच्यावर लावला.
नोव्हेंबरमध्ये मतदानाच्या काही आठवडे आधी झेलेन्स्की जो बायडन यांच्या मूळ गावातल्या पेन्सिल्व्हेनियातील स्क्रॅन्टनमधल्या युद्ध साम्रगी बनवणाऱ्या एका कारखान्याला भेट द्यायला गेले होते. व्हेन्स त्याला उद्देशून टोमणा मारत होते.
त्यांच्या भेटीनंतर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कारखान्याला दिलेली भेट झेलेन्स्की यांनी कमला हॅरिस यांचा बॅटलग्राऊंड स्टेटमध्ये प्रचार करण्यासाठी वापरली असं त्यांचं म्हणणं होतं.
जागतिक सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणावर बैठकीत चर्चा सुरू झाली.
"प्लीज, तुम्हाला जर असं वाटत असेल की, युद्धाविषयी मोठ्या आवाजात बोलून.." हे बोलतानाच झेलेन्स्कींनी ट्रम्प यांनी मध्येच थांबवलं.
"ते मोठ्या आवाजात बोलत नाहीत," असं ते म्हणाले. त्यांची चिडचिड स्पष्ट दिसत होती.
"तुमचा देश मोठ्या संकटात आहे. तुम्ही हे युद्ध जिंकणार नाही. आमच्यामुळं त्यातून सहीसलामत बाहेर पडायची संधी तुम्हाला मिळतेय," असं ट्रम्प म्हणाले.
4) याची किंमत कोणाला मोजावी लागणार?
"अशा पद्धतीने काम करणं अतिशय अवघड आहे. करार करण्याआधी वृत्ती बदलायला हवी," असं ट्रम्प म्हणाले.
झेलेन्स्की मुजोरी करत आहेत असा समज करून घेऊन राष्ट्रध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांनी त्यांना चांगलंच फटकारलं.
"तुम्ही फक्त आमचे आभार माना," असं वेन्स म्हणाले.
जगातल्या दोन शक्तीशाली नेत्यांसमोर झेलेन्स्की पाय रोवून त्यांच्या देशाच्या बाजूने उभे राहिले. त्यांच्या देशासाठी हा काळ किती अवघड आहे याचीच प्रचिती त्यातून येते.
परकीय आक्रमणापासून गेली तीन वर्ष झेलेन्स्की त्यांच्या देशाचं रक्षण कर आहेत. सोबतच देशातला समाज आणि राजकीय नेत्यांना तोडण्याचा पुतीन प्रयत्न करत असताना बंधुत्व टिकवून ठेवण्याचा कस त्यांना लावावा लागत आहे.
या प्रमुख नेत्यांचं भांडण सुरू असताना त्या खोलीतला आणखी एक चेहरा बघण्यासारखा होता. नेत्यांमधला वाद वाढला तसा वॉशिंग्टनमधल्या झेलेन्स्की यांच्या राजदूत ओक्साना मार्कारोवा यांनी त्यांच्या डोक्याला हात लावला होता.
झेलेन्स्की यांची मुत्सदेगिरी आणि रशियाला मागे ढकलण्याच्या प्रयत्नांत आत्तापर्यंत त्यांना पाठिंबा देणाऱ्या सुपरपॉवर देशांसोबतचे त्यांचे संबंध याचा सारांशच त्या चित्रात दिसत होता.
झेलेन्स्की शुक्रवारी उभे राहिले तसं ट्रम्प यांच्याविरोधात उभं राहणं हे कदाचित त्यांना अखेर पुतीनसमोर पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतं.
Comments
Leave a Comment